पुणे, १९ नोव्हेंबर :माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांचे पती चंद्रकांत टिंगरे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला आहे. चंद्रकांत टिंगरे महाविकास आघाडीचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांचा प्रचार करत होते. हल्ल्यानंतर टिंगरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
६ दिवसांपूर्वीच रेखा टिंगरे, चंद्रकांत टिंगरे आणि भाजप नेते समीर धनकवडे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
रेखा टिंगरे यांचा राजकीय प्रवास अनेक वळणांवर गेला आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता, पण चार महिन्यांपूर्वी अजित पवार यांच्या गटात सामील झाल्या होत्या. मात्र, गेल्या आठवड्यात शरद पवार यांच्या गटात परत प्रवेश केला.हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बापूसाहेब पठारे यांनी निंदा केली. ते म्हणाले की, निवडणूक मतदानाच्या काही तास आधी हल्ला करणे ही अत्यंत निषेधार्ह गोष्ट आहे. महत्वाच्या नेत्यावर,कार्यकर्त्यांवर हल्ला होणे ही अतिशय निषेधार्ह गोष्ट आहे. विचारांची लढाई विचाराने लढली पाहिजे. हिंसेचा आधार घेऊन कोणी धमकावत असेल तर त्यांचे मनोदय यशस्वी होणार नाहीत. ही संतांची आणि वारकऱ्यांची भूमी आहे. निर्भय बनून हिंसेचा प्रतिकार केला जाईल आणि लोकशाहीच्या मार्गाने हल्लेखोरांना धडा शिकवला जाईल, असा इशारा त्यांनी दिला.पोलिसांनी हल्ल्याचा तपास सुरू केला असून, हल्लेखोर कोण होते आणि त्यांचा नेमका हेतू काय होता, हे तपासातून पुढे येईल.