महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी बुधवारी मतदान

0

निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज

मुंबई, 19 नोव्हेंबर : राज्य विधानसभेच्या 288 जागा आणि नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उद्या, बुधवारी मतदान होणार आहे. त्यानुषंगाने निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण झाली असून प्रशासन सज्ज झाले आहे.

राज्यातील विधानसभेच्या 288 जागांवर अपक्षांसह विविध पक्षांचे एकूण 4136 उमेदवार रिंगणात आहेत. राज्यातील 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदार या उमेदवारांच्या भाग्याचा फैसला करणार आहे.

या निवडणुकीसाठी राज्यात 1,00,427 मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदानाची वेळ ही सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत राहील.

संवेदनशील मतदान केंद्रांवर केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. राज्यातील एकूण 1,00,427 इतक्या मतदान केंद्रांपैकी, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 दरम्यान 67,557 इतक्या मतदान केंद्रांवर वेबकास्टींग प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर एकूण 158 पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यापैकी 6 मोठे पक्ष मविआ आणि महायुती या 2 आघाड्यांचा भाग म्हणून निवडणूक लढवत आहेत.

शिंदे गटातील शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस हे भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेतृत्वाखालील महाआघाडीचा भाग आहेत. तर काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना (उबाठा) आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) म्हणजेच एनसीपी (एसपी) हे महाविकास आघाडीचा भाग आहेत.

निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, या निवडणुकीत अपक्षांसह विविध पक्षांचे एकूण 4136 उमेदवार रिंगणात आहेत. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मने (एडीआर) यापैकी 2201 उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांची तपासणी करून अहवाल तयार केला आहे.

त्यानुसार 629 उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. त्यापैकी 412 जणांवर खून, अपहरण, बलात्कार असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर 50 उमेदवारांवर महिलांशी संबंधित गुन्ह्यांचे आरोप आहेत.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech