जिल्हाधिकारी अनिल पाटील आणि एसपी सौरभकुमार अगरवाल यांनी केली मतदान केंद्राची पाहणी
११ वाजेपर्यंत २३ टक्के मतदान
सिंधुदुर्ग, 20 नोव्हेंबर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी या तीनही विधानसभा मतदारसंघात मतदानाला आज दि. 20 नोव्हेंबर, 2024 रोजी सकाळी 7.00 वाजेपासून अंत्यत उत्साहात सुरुवात झाली. जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदार संघात आज सकाळी मतदानास सुरुवात होताच शहरासह ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा दिसून आल्या.
जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी स्वत: रानबांबुळी, कुडाळ शहरातील कुडाळ हायस्कूल, न्यू इंग्लिश स्कूल, येथील मतदान केंद्राला भेट देवून मतदान केंद्रांची पाहणी केली. यावेळी त्यांनी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, बंदोबस्तावरील पोलीसांना आवश्यक त्या सूचना दिल्यात. स्वत: जिल्हाधिकारी अनिल पाटील हे जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या वेबकास्टिंगच्या माध्यमामातून जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रांसह संपूर्ण मतदान प्रकियेवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. ७ ते ११ वाजेपर्यंत जिल्ह्यात २३ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी देखील आज कुडाळ शहरातील कुडाळ हायस्कूल येथील पाच मतदान केंद्रांना भेट देऊन पाहणी केली. तसेच मतदारांशी संवाद साधला.
मतदानाच्या या उत्साहात ज्येष्ठ नागरीक, महिला, पुरुष, दिव्यांग व्यक्तीं, नवमतदार उत्स्फूर्त सहभाग नोंदविताना दिसून आले. सर्व मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. त्यात पिण्याचे पाणी, मंडप किंवा शेड, मतदार सहाय्य्यता केंद्र, प्रथमोपचार पेट्या, तसेच आरोग्याशी संबंधित अडचणीसाठी आरोग्य केंद्र, अंगणवाडी व बालसंगोपन केंद्र, व्हीलचेअर या सह सर्व प्रकारच्या पूरक सोयी सुविधा जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध करुन दिल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांनी समाधान व्यक्त केले.
दरम्यान कुडाळ मध्ये काही ठिकाणी पोलीस बळ कमी असल्याने एनसीसीचे १७ कॅडेट आणि एनएसएसचे ६ विद्यार्थी मदत करत आहेत, अशी माहिती कुडाळचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली.