ठाणे : ठाणे शहरात सुरू असलेल्या बोगस शिक्षणसंस्थांकडून सामान्य व गरीब कुटुंबातील तरुण व तरुणींची फसवणूक होत असल्याप्रकरणी चौकशी करुन संबंधित शिक्षणसंस्थांच्या संचालकांविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजपा महिला मोर्चा मंडलाध्यक्षा वृषाली वाघुले यांनी पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याकडे केली आहे. या संदर्भात आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घेऊन योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
ठाणे रेल्वे स्टेशन, राम मारुती रोड, नौपाडा परिसरासह शहरातील महत्वाच्या गजबलेल्या भागात काही बोगस शिक्षण संस्था स्थापन करण्यात आल्या आहेत. राज्यातील प्रसिद्ध विद्यापीठातील अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून विद्यार्थ्यांना तेथे प्रवेश दिला जातो. अभ्यासक्रमाचे शुल्क कर्जरुपाने उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले जाते. त्यानंतर गरीब व सामान्य कुटुंबातील विद्यार्थी-विद्यार्थीनींची कागदपत्रे मिळवून त्यांना कर्जाच्या जाळ्यात ओढले जात असल्याचे प्रकार घडले आहेत. या तरुण-तरुणींची भविष्यातही फसवणूक होणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही, असा आरोप या निवेदनात म्हटले आहे.
ठाणे शहरातील राम मारुती रोड येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या पहिल्या मजल्यावरील बनावट सीईडीपी स्कील्ड इन्स्टिट्यूटबाबत तक्रारी आल्यानंतर भाजपा व भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी संबंधित संचालकांना जाब विचारला. त्यावेळी तेथे जनरल नर्सिंग कोर्सचे शिक्षण देण्याच्या नावाखाली सुरू असलेले फसवणुकीचे रॅकेट महिनाभरापूर्वी उघडकीस आले होते. त्यानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी फसवणूक झालेल्या ८ मुलींना १ लाख ६२ हजार रुपयांची रक्कम मिळवून दिली. या वेळी संबंधित तरुण-तरुणींची महत्वाची शैक्षणिक कागदपत्रे, मूळ आधारकार्ड व इतर कागदपत्रे ठेवून शैक्षणिक शुल्काची मागणी केली जात असल्याचेही आढळले होते. `सीईडीपी’ संस्थेप्रमाणेच ठाणे शहरात अनेक बनावट शिक्षणसंस्थांमध्ये दहावी नापास व अल्पशिक्षित तरुण-तरुणींनाही चांगल्या अभ्यासक्रमानंतर नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखविले जात असल्याच्या तक्रारी आहेत. गुणवत्ता यादीत प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थी-विद्यार्थीनींना टार्गेट केले जाते. त्यातून हजारो रुपयांचे शैक्षणिक शुल्क वसूल करुन शेकडो जणांची फसवणूक होत आहे. तरी या प्रकाराची दखल घेऊन आपण ठाणे शहरातील काही संशयास्पद शिक्षण संस्थांकडील मान्यता व इतर कागदपत्रांची तपासणी करुन कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.