सॅन फ्रान्सिस्को : – जगप्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन यांचं निधन झाले आहे. ते ७३ वर्षांचे होते. उस्ताद झाकीर हुसेन यांची प्रकृती खालावल्याने त्यांना अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण त्यांची आता प्राणज्योत मालवल्याची दुर्दैवी बातमी समोर आली आहे. त्यांच्या जाण्याने कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. या वृत्ताला त्यांच्या जवळच्या मित्राने दुजोरा दिला आहे.
उस्ताद झाकीर हुसेन गेल्या काही वर्षांपासून हृदयविकाराच्या आजाराचा सामना करत होते. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
झाकीर हुसेन हे संगीत जगतातील एक मोठे नाव होतं. उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म 9 मार्च 1951 मध्ये मुंबईत झाला. झाकीर हुसेन हे जगातील महान तबलावादकांपैकी एक मानले जातात. भारतीय शास्त्रीय संगीतात त्यांचे योगदान मोठं आहे. झाकीर हुसैन यांच्या असामान्य प्रतिभेमुळे त्यांना गेल्या काही वर्षांत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. भारत सरकारने त्यांना 1988 मध्ये पद्मश्री, 2002 मध्ये पद्मभूषण आणि 2023 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. झाकीर हुसेन यांना 1999 मध्ये यूएस नॅशनल एन्डॉवमेंट फॉर द आर्ट्सने नॅशनल हेरिटेज फेलोशिप दिली, तेव्हा त्यांना भारतीय शास्त्रीय संगीताचे जागतिक राजदूत म्हणून ओळखले गेले.
झाकीर हुसेन यांचे वडील अल्ला राख हे देखील प्रसिद्ध तबलावादक होते. उस्ताद झाकीर हुसेन यांच्या बँडने अलीकडेच जानेवारी 2025 मध्ये होणाऱ्या भारत दौऱ्याची घोषणा केली होती. त्यांनी आपल्या संगीतातून अनेक भारतीयांना प्रेरणा दिली आहे. वयाच्या तिसऱ्या वर्षी वडिलांच्या देखरेखीखाली त्यांनी संगीत शिकण्यास सुरुवात केली. झाकीर हुसैन यांनी वयाच्या 7व्या वर्षी पहिला परफॉर्मन्स दिला होता. झाकीर हुसेन हे पहिले भारतीय आहेत ज्यांना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी व्हाईट हाऊसमध्ये ऑल-स्टार ग्लोबल कॉन्सर्टसाठी आमंत्रित केलं होतं.