मणिपूर प्रकरणी एलन मस्कने ठेवले कानावर हात

0

स्टारलिंक डिव्हाईसच्या वापराचे दावे फेटाळले

नवी दिल्ली  : मणिपूरमध्ये स्टारलिंकसारखे उपकरण आढळल्याबद्दल स्पेसएक्सचे संस्थापक एलन मस्क यांनी कानावर हात ठेवले आहेत. मणिपूरमध्ये स्टारलिंक डिव्हाईस वापरले जात असल्याच्या दाव्याचा मस्क यांनी इन्कार केलाय. तसेच भारतावरील स्टारलिंक सॅटेलाईट बीम बंद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात मस्क यांनी ट्विटरवर (एक्स) पोस्ट करत खुलासा केलाय.

मणिपूरच्या इम्फाल पूर्व जिल्ह्यातील केराव खुनौ येथे गेल्या आठवड्यात केलेल्या छापेमारीत शस्त्रास्त्रे आणि दारूगोळ्यांसह काही इंटरनेट उपकरणे जप्त करण्यात आली होती. भारतीय लष्कराच्या स्पिअर कॉर्प्सने घटनास्थळी जप्त केलेल्या वस्तूंची छायाचित्रे शेअर केली होती. यानंतर सोशल मीडियावर लोकांनी दावा केला की एका डिव्हाईसवर स्टारलिंक लोगो आहे.

एका ट्विटर युजरने म्हंटले की, दहशतवादी स्टारलिंकचा वापर करीत आहेत. आशा आहे की इलॉन मस्क याकडे लक्ष देतील आणि या तंत्रज्ञानाच्या गैरवापरावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतील. यावर मस्कने ट्विटरवर उत्तर दिले, ‘हे चुकीचे आहे. भारतावरील स्टारलिंक सॅटेलाइट बीम बंद करण्यात आले आहेत. उपग्रह इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या एलन मस्कच्या स्टारलिंककडे भारतात ऑपरेट करण्याचा परवाना नाही.

राज्य पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केराव खुनौ येथून जप्त केलेल्या वस्तूंमध्ये इंटरनेट सॅटेलाइट अँटेना, इंटरनेट सॅटेलाइट राउटर आणि 20 मीटर (अंदाजे) एफटीपी केबलचा समावेश आहे. स्टारलिंकसारखी उपकरणे जप्त केल्यानंतर आता एजन्सी ही उपकरणे संघर्षग्रस्त अवस्थेत कशी पोहोचली याचाही तपास करत आहेत. मणिपूरमध्ये मे 2023 पासून मैतेई आणि कुकी जमातींमध्ये संघर्ष पसरला असून आतापर्यंत 250 लोकांचा मृत्यू झाला असून शेकडे लोक बेघर झाले आहेत. गेल्या 13 डिसेंबर रोजी सुरक्षा दलांनी मणिपूरच्या इम्फाल पूर्व जिल्ह्यातून स्निपर रायफल, पिस्तूल, ग्रेनेड आणि इतर शस्त्रांसह स्टारलिंकसारखे इंटरनेट उपकरण जप्त केले आहे. यासंदर्भातील जाणकारांनी सांगितले की, स्टारलिंक सारखे उपकरण आढळून येणे हा तपासाचा विषय आहे. स्टारलिंककडे भारतात काम करण्याचा परवाना नाही. तथापि, पुनर्प्राप्त केलेले डिव्हाइस अस्सल स्टारलिंक डिव्हाइस आहे की नाही याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती पुढे आलेली नाही.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech