ठाणे : नुकतेच राज्याच्या मंत्रिमंडळाचे खाते वाटप करण्यात आले. राज्याच्या परिवहन मंत्री पदाची प्रताप सरनाईक यांना जबाबदारी देण्यात आली. लगेच रविवारी सकाळी प्रताप सरनाईक यांनी खोपट येथील बस स्थानकाचा आढावा घेतला.
तत्कालीन मुख्यमंत्री, व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी १५ फेब्रुवार०२४ रोजी खोपट बस आगार येथे इलेक्ट्रिक बस सेवा उद्घाटन प्रसंगी परिवहन सेवा, बस आगार व कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा सुधारण्याकरिता काही सूचना दिल्या होत्या. सदर सूचनांची अंमलबजावणी प्रत्यक्षात झाली की नाही हे पाहण्याकरिता परिवहन मंत्री मा. ना. श्री. प्रताप सरनाईक यांनी खोपट बस आगार भेट देऊन तेथील सेवा, व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांच्या सुविधांबाबत आढावा घेतला.
प्रवाशांसाठी अधिक चांगल्या सोयी-सुविधा पुरवण्यासाठी तसेच कर्मचाऱ्यांना कामाचे सुसज्ज वातावरण देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना दिल्या. बस आगारात स्वच्छता गृह, प्रतीक्षालय आणि पिण्याच्या पाण्याच्या सुविधा उभारण्याचे निर्देश दिले. तसेच तेथील नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून त्या सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
खोपट बस आगारातील अतिक्रमण तसेच गर्दुल्ले यांचा वावर त्वरित थांबवण्यात यावा अशा सूचना संबंधित अधिकाऱ्याला दिल्या. तसेच राज्यातील सर्वच बस आगारांना भेट तेथील नियोजन व समस्यांचा आढावा घेणार आहे, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.