नंदेश उमप यांच्या गायनाने रंगला यंदाचा कोळी महोत्सव

0

ठाणे : पारंपारिक वेशभूषा, पायांना आपसूक ठेका धरायला लावणारे लोकसंगीत आणि कोळी पद्धतीने बनवलेल्या जेवणाची साथ यामुळे चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कला मंच आयोजित कोळी महोत्सव मोठया उत्साहात पार पडला. त्यात ख्यातनाम लोकगीते गायक नंदेश उमप यांनी केवळ उपस्थित न राहता आपली गायकी पेश केल्याने कार्यक्रमाची रंगत आणखी वाढली.

चेंदणी कोळीवाड्यातील विठ्ठल मंदिरापासून सुरु झालेली शोभयात्रा चेंदणी बंदरावर दाखल झाल्यावर श्री आनंद भारती समाजाचे माजी अध्यक्ष सुभाष मोरेकर, सुभाष देवराम कोळी-कमल सुभाष कोळी, दिनकर यशवंत कोळी-प्रमिला यशवंत कोळी या दाम्पत्यांच्या हस्ते द्वीपप्रज्वलन करून कोळी महोत्सवाची सुरुवात करण्यात आली.

त्यानंतर स्थानिक गायक आणि लहान मोठ्या कलाकारांनी आपल्या नृत्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या कोळी महोत्सवाचे औचित्य साधून विविध क्षेत्रांत भरीव कामगिरी करणाऱ्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.

त्यात वयाच्या सत्तरीनंतर सूक्ष्म जीवशास्त्र विषयात डॉक्टरेट मिळवणारे डॉ दिलीप नाखवा, नोटरी पदावर नियुक्त झालेल्या ऍड अनुराधा टिल्लू, एलएलएम ची पदवीधर कृपाली कोळी, राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय विकास मंडळाच्या अध्यक्षा विभता अभिनय कोळी, निवेदक आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी महेंद्र कोंडे, मलेशियातील ट्रायथलॉन स्पर्धेत आयर्न मॅन ठरलेले मिनेश आणि गुंजन कोळी दांपत्य, वीरेंद्र पाटील, राष्ट्रीय खो खो पटू शिवम तांडेल, हर्षित कोळी यांचा समावेश होता.

कोळी महोत्सवाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या कोळी पदार्थांच्या पाककला स्पर्धेत यतीन कोळी ( स्टफ बोंबील), सोनाली कोळी (चिंबोरी मसाला) आणि निता कोळी (चिंबोरी भात) आदी अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे विजेते ठरले.

खासदार नरेश म्हस्के, माजी नगरसेविका नम्रता कोळी, महदीप बिष्ट आणि इतर मान्यवरांनी यावेळी उपस्थिती लावली.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech