मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असून २३० जागांवर विजय मिळवला आहे. भाजपने १३२, शिवसेना (शिंदे गट) ने ५७, तर राष्ट्रवादी (अजित पवार गट) ने ४१ जागा जिंकल्या.
दुसरीकडे महाविकास आघाडीला फक्त ४६ जागा मिळाल्या असून काँग्रेसला १६, ठाकरे गटाला २० आणि शरद पवार गटाला १० जागांवर समाधान मानावे लागले. या विजयामुळे राज्यात महायुतीची सत्ता येणे निश्चित आहे.
विधानसभेतील निकालानंतर विधान परिषदेतील ६ जागा रिक्त झाल्या आहेत. यामध्ये भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे, गोपीचंद पडळकर, रमेश कराड आणि प्रविण दटके तसेच शिवसेनेचे आमश्या पाडवी आणि राष्ट्रवादीचे राजेश विटेकर हे विधानसभेसाठी निवडून आले आहेत.
त्यामुळे विधान परिषदेतील या जागांसाठी आता नव्या नेत्यांची निवड होणार आहे. महायुतीतील तीनही पक्ष या रिक्त जागांसाठी संभाव्य उमेदवार निश्चित करण्यासाठी लॉबिंग करत आहेत.
विशेषतः विधानसभेचे तिकीट न मिळालेल्या नाराज नेत्यांना शांत करण्यासाठी या जागांचा उपयोग होणार आहे. भाजपकडून अधिक वजनदार नेत्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी (अजित गट) देखील नाराजांना खुश करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
सध्या सर्वांचे लक्ष महायुतीच्या निर्णयाकडे लागले आहे. कोणते नेते या लॉटरीतून विधान परिषदेवर पोहोचतात, हे लवकरच स्पष्ट होईल.