जम्मू-काश्मीर : लष्करचा टॉप कमांडर उस्मान ठार

0

विविध चकमकीत 3 दहशतवाद्यांना कंठस्नान

श्रीनगर  : जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमधील खानयार भागात सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. त्यांनी लष्कर-ए-तैयबाचा कमांडर उस्मान याला चकमकीत ठार केले आहे. उस्मान हा दहशतवादी सज्जाद गुलचा उजवा हात मानला जात होता. उस्मानच्या हत्येने संपूर्ण लष्कर नेटवर्कला मोठा धक्का बसला आहे.

उस्मान गेल्या दोन दशकांपासून संघटनेसाठी सक्रियपणे काम करत असल्याचे सुरक्षा दलांनी सांगितले. जम्मू- काश्मीरमध्ये गेल्या 24 तासांत 3 वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

या चकमकींमध्ये श्रीनगर, बांदीपोरा आणि अनंतनागचा समावेश आहे. बांदीपोरामध्ये अजूनही चकमक सुरू आहे, तर अनंतनागच्या जंगलात शनिवारी सुरू झालेल्या चकमकीत 2 दहशतवादी ठार झाले.

तिन्ही ठिकाणी शोध मोहिमेत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे.या चकमकी आणि दहशतवाद्यांचा खात्मा केल्याने काश्मीरमधील दहशतवादी कारवाया काही प्रमाणात कमी होतील, असा सुरक्षा दलांचा विश्वास आहे. उस्मानचे टोपण नाव “छोटा वलीद” होते आणि तो काश्मीरमधील लष्कर-ए-तैयबाचा सर्वात वरिष्ठ कमांडर मानला जात होता.

अलीकडच्या काळात त्याच्या कारवाया सातत्याने वाढत होत्या. याच कारणामुळे तो सुरक्षा दलांच्या हिटलिस्टमध्ये टॉपवर आला होता. ऑक्टोबर 2023 मध्ये श्रीनगरच्या इदगाह भागात स्थानिक क्रिकेट खेळादरम्यान जम्मू-काश्मीरचे पोलीस निरीक्षक मसरूर यांच्या हत्येप्रकरणी उस्मानच्या भूमिकेची चौकशी सुरू आहे.

सुरक्षा दलांच्या म्हणण्यानुसार, उस्मानची हत्या ही दहशतवादाविरुद्धची मोठी उपलब्धी आहे. आयजीपी व्हीके बिर्डी यांनी सांगितले की, सुरक्षा दलांनी ठार केलेल्या दहशतवाद्याचे नाव उस्मान असून तो लष्करचा टॉप कमांडर होता.

या कारवाईत 4 सुरक्षा कर्मचारी जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले. इन्स्पेक्टर मसरूर यांच्या हत्येमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्याची भूमिका आणि सहभाग समोर आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

खन्यार चकमकीदरम्यान सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार गोळीबार झाला. या चकमकीत 2 सीआरपीएफ जवान आणि 2 पोलीस जखमी झाले. चकमकीनंतर सुरक्षा दलांनी घटनास्थळावरून उस्मानचा मृतदेह तसेच मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त केला. ही चकमक 15 सप्टेंबर 2022 नंतर श्रीनगरमध्ये झालेली सर्वात मोठी दहशतवादी चकमक मानली जाते.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech