मुंबई , २ नोव्हेंबर : ऐन दिवाळीत मुंबईच्या लोकल रेल्वे सेवेला मोठा फटका बसला होता. मुंबईची लाईफलाईन मानली जाणारी लोकल सेवा विस्कळीत झाली होती. लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांना सिग्नल न मिळाल्यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीत मोठा अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे लोकल गाड्या २० ते २५ मिनिटे उशिराने धावल्या. त्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला.
दिवाळीच्या सलग सुट्ट्या असल्याने अनेक मुंबईकरांनी बाहेर जाण्याचे नियोजन केले होते. विकेंडच्या दिवशी अशी विस्कळीत सेवा झाल्याने त्यांची गैरसोय झाली. मध्य रेल्वेवरील गाड्या १५-२० मिनिटे उशिराने धावल्या. विशेषतः कल्याण ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मार्गावर अनेक लोकल गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने धावत होत्या. याशिवाय धीम्या मार्गावरील लोकलचा वेग देखील कमी झाला होता.
तसेच पश्चिम रेल्वेवरील वाहतूकही धीम्या गतीने सुरू होती. विरारहून चर्चगेटकडे जाणाऱ्या गाड्या ५ ते १० मिनिटे उशिराने धावत होत्या तर धीम्या मार्गावरील गाड्या देखील १० मिनिटे उशिराने सुरू होत्या. पश्चिम रेल्वेवर गर्डरचे काम सुरू असल्यामुळे ही सेवा विस्कळीत झाली होती.