मुंबई, १९ नोव्हेंबर : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वीच विरार कॅश कांड प्रकरण तापले आहे. बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर ९ लाख रुपये वाटत असल्याचा आरोप केला.
या दरम्यान, विरार पूर्वेच्या मनवेलपाडा येथील हॉटेल विवांतच्या रुम नंबर ४०४ मध्ये ९ लाख रुपये रोख रक्कम सापडली, त्यामुळे वादंग माजला. तावडे आणि भाजपचे उमेदवार राजन नाईक यांच्यावर आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला गेला. याबाबत बोलताना बविआचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी मोठा गौप्यस्पोट करत विनोद तावडे पैसे वाटणार असल्याची टीप आपल्याला भाजपमधूनच मिळाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
तर दुसरीकडे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी प्रतिक्रिया विनोद तावडे यांनी दिली आहे. हितेंद्र ठाकूर यांनी विनोद तावडेंच्या सोबत असणाऱ्या डायऱ्याच थेट माध्यमांच्या कॅमेऱ्यावर दाखवल्यात. पाच कोटीच वाटप चालू आहे.
मला डायऱ्या मिळाल्या आहेत. लॅपटॉप आहे. कुठे-काय वाटप झालय त्याची माहिती आहे, असा दावा करत ‘वसई रोड ५, वसई पश्चिम ४ असा त्या डायरीत उल्लेख आहे. ४ वाजता कुठे पैसे पोहोचवायचे हे सर्व त्यात लिहिलय, असं त्यांनी सांगितलं.
तसेच विनोद तावडे यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. निवडणूक आयोगाने या प्रकरणी लक्ष ठेवले असून, पालघर जिल्हाधिकारी आणि पोलिस यंत्रणांनी या घटनेच्या ठिकाणी तपास सुरू केला आहे.
आयोगाने याबाबत निवडणूक नियमांचे उल्लंघन टाळण्यासाठी योग्य कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे. ही घटना निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात घडल्यामुळे राजकारणात तीव्र वाद सुरू झाला आहे. ठाकूर यांनी याबाबत डायऱ्या आणि लॅपटॉपचा उल्लेख करून, पैसे वाटपाच्या घटनांबाबत अधिक माहिती दिली.