बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ
तावडेंच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार
मुंबई, 19 नोव्हेंबर : क्षितीज ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने (बविआ) भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप केला. मुंबईच्या विरार परिसरातील हॉटेल विवांतामध्ये बविआच्या कार्यकर्त्यांनी आज, मंगळवारी तावडेंना घेराव घातला. याप्रकरणी बविआने तावडेंच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. दरम्यान तावडेंनी हे सर्व आरोप फेटाळून लावत सीसीटीव्ही फुटेज तपासून निष्पक्ष चौकशीची मागणी केलीय.
बहुजून विकास आघाडीने केलेल्या आरोपानुसार आज मंगळवारी विनोद तावडेही विरार येथील मनोरीपाडा येथील हॉटेल विवांत येथे आले होते. यावेळी त्यांच्या सोबत भाजपचे उमेदवार राजन नाईक व काही पदाधिकारी होते. त्यांच्यात बैठक सुरू असतांना बहुजन विकास आघाडीचे काही कार्यकर्ते ही थेट या हॉटेलमध्ये घुसले. यावेळी तावडे हे पैसे वाटत होते. तब्बल 5 कोटी रुपयांचे वाटप झाल्याचा आरोप बविआने केला आहे. दरम्यान, या कार्यकर्त्यांना भाजप कार्यकर्त्यांनी रोखले. यामुळे दोन्ही गटात तुफान राडा झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना शांत करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. बहुजन विकास आघाडी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी करत होते.
या प्रकरणी बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांनी विनोद तावडे यांच्यावर गंभीर आरोप केले. ठाकूर म्हणालेत की, विनोद तावडे हे विवांता हॉटेलमध्ये 5 कोटी रुपये घेऊन त्याचे वाटप करत होते. पोलीस हॉटेलमध्ये पोहोचले तेव्हा त्यांना 2 डायऱ्या सापडल्या आहेत. आता प्रचार संपला आहे. त्यानंतर देखील विनोद तावडे हे मतदार संघात कसे आहेत? मतदानाच्या 48 तास आधी बाहेरच्या नेत्यांनी मतदारसंघ सोडायचे असतात, हे त्यांना माहीत नाही का ? असे प्रश्न देखील ठाकूर यांनी उपस्थित केले आहेत. दरम्यान, पराभव पुढे दिसत असल्याने असे आरोप विरोधक करत असल्याचा आरोप भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी केला आहे.