नागपूर, 12 नोव्हेंबर : काँग्रेस आणि उबाठाच्या महाविकास आघाडी महाराष्ट्राला लव्ह आणि लँड जिहादची भूमी बनवू इच्छीत असल्याचा आरोप उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी केला.
नागपुरातील रेशीमबाग परिसरात आयोजित निवडणूक सभेला संबोधित करताना ते बोलत होते. याप्रसंगी योगी म्हणाले की, भाजपने देशाच्या सीमा सुरक्षित करत येथील परंपरा व इतिहासाची प्रतिके जपली आहेत.
काँग्रेसलादेखील देशाच्या सीमा सुरक्षित करता आल्या असत्या. मात्र व्होट बॅंकेच्या राजकारणापुढे त्यांनी देशाला कधीच महत्त्व दिले नाही. त्यांच्याजवळ देशाच्या विकासाचे कुठलेही व्हिजन नाही. सातत्याने समाजाची दिशाभूल करून महाविकासआघाडीकडून देशात जातीपातींमध्ये वाटण्याचे काम सुरू आहे.
महाराष्ट्राला तर त्यांना लव्ह जिहाद व लॅंड जिहादची भूमी करायचे आहे, असा आरोप योगी आदित्यनाथ यांनी लावला.
देशात व राज्यात काँग्रेसला अनेक वर्ष राज्य करण्याची संधी मिळाली. मात्र देशाच्या सीमा, सुरक्षा, प्रतिके यांचे रक्षण करण्यासाठी कधीच त्यांनी पुढाकार घेतला नाही. इतकेच काय तर महिलांच्या सुरक्षेप्रतिदेखील ते कायम उदासीन राहिले.
पाकिस्तानला एकाही दहशतवादी हल्ल्यानंतर थेट सवाल करण्याची हिंमत त्यांच्यात का नव्हती..?असा सवाल योगी आदित्यनाथ यांनी केला. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना योगी म्हणाले की, खरगे खरे बोलायला घाबरतात, माझ्या बटेंगे तो कटेंगे या घोषणेवर कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सातत्याने टीका करत आहेत.
मात्र निजामाच्या रझाकारांनी मल्लिकार्जुन खरगे यांचे गाव जाळले होते. त्यात त्यांची आई, मावशी आणि बहिणीचा मृत्यू झाला. पण, खरगे खरे बोलायला घाबरतात, कारण निजामावर आरोप केले तर मुस्लिम मते मिळणार नाहीत हेच त्यांच्या डोक्यात आहे.
मतांसाठी खरगे कुटुंबाचा त्याग विसरले, असा टोला देखील योगी आदित्यनाथ यांनी लावला. यावेळी प्रचार सभेला यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आ.विकास कुंभारे, आ.कृपाल तुमाने, शहराध्यक्ष बंटी कुकडे, माजी महापौर दयाशंकर तिवारी प्रामुख्याने उपस्थित होते.