नागपूर : राज्यातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप आगामी 2 दिवसात पूर्ण करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून प्रारंभ होतोय. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत फडणवीस बोलत होते.
नागपूरच्या राजभवनात रविवारी 33 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्री अशा एकूण 39 मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. त्यानंतर खाते वाटपाबाबत उत्सुकता ताणली गेली होती. त्यानुषंगाने फडणवीस म्हणाले की, मंत्रिमंडळामध्ये सर्व समाजाला स्थान दिले आहे. काही नाराज असून त्यांची समजूत काढू. तसेच येत्या 2 दिवसात खातेवाटपही पूर्ण केले जाईल असे फडणवीस यांनी सांगितले. हिवाळी अधिवेशनात अभिभाषणावरील चर्चा आणि 20 बीले मांडणार आहोत. मी व माझे सहकारी चांगल काम करुन दाखवू अशी ग्वाहीही त्यांनी दिली. ईव्हीएम संदर्भात मुख्यमंत्री म्हणाले की, ईव्हीएम म्हणजे “एव्हरी व्होट फॉर महाराष्ट्र” आहे. विरोधक ईव्हीएम संदर्भात ते एक नेरेटिव पसरवत आहेत. आता त्यांच्याकडे कोणताही मुद्या राहिलेला नाही. सोयाबीनच्या खरेदीत मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू आहे, सोयाबिनचा हमी भावापेक्षा कमी रेट होता तो आम्ही वाढवून यावेळी दिला आहे. तसेच धानाच्या शेतकऱ्याला आम्ही मदत केल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
बीडमध्ये झालेल्या सरपंच हत्याप्रकरणी बोलताना ते म्हणाले की बीड जिल्ह्यातील जी घटना निर्घृण आहे. या संबंधी कारवाई झाली आहे, तीन आरोपी सापडले आहे इतरही लवकरच सापडतील आम्ही कोणत्याच आरोपीला सोडणार नाही. एसआयटी नेमून त्याच्या माध्यमातून सर्व धागे दोरे आम्ही काढू. पूढे त्यांनी विरोधकांना टोला लगावला. चर्चा न करता पळ काढू नये, सभागृहात बोला केवळ मीडियातून बोलू नका असे विराधकांना सांगितले. आम्ही सर्व मुद्यावर चर्चा करू असेही त्यांनी स्पष्ट केले.