मुंबई, १९ नोव्हेंबर : विरारमध्ये भाजप नेते विनोद तावडे यांना घेरून त्यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर आणि त्यांचे पुत्र क्षितीज ठाकूर यांनी तावडे यांच्या बॅगेत ५ कोटी रुपये असल्याचा आरोप केला. मात्र याचे तावडे यांनी खंडन केले. या राड्यादरम्यान, क्षितीज ठाकूर यांनी मीडियासमोर पैशांचे बंडल दाखवले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, निवडणूक आयोगाने या व्हिडीओसाठी तपास सुरू करावा. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे डोके आपोआप फुटले का असा सवाल करत ते म्हणाले की त्यांचा एक व्हिडीओ आला आणि त्यानंतर आज पैशांचे वाटप समोर आले. हे जादूचे पैसे कुठून आले आणि कोणाच्या खिशातून जात होते, याची माहिती समोर यायला हवी.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, आता मी तुळजाभवानीला गेलो तेव्हा माझी बॅग तपासली. ह्यांच्या बॅगेतील पैसे तपासणार कोण? निवडणूक आयोगाने ह्यांच्या बॅगेची तपासणी केली पाहिजे. नाहीतर निवडणूक आयोगावर कारवाई करण्यासाठी आम्हाला काहीतरी वेगळा मार्ग बघावा लागेल, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.निवडणूक आयोगाने तावडे यांच्या बॅगेची तपासणी केली पाहिजे.
कदाचित तावडे यांच्या गटांमध्ये गँगवार असेल, परंतु महाराष्ट्राने हे पाहिले पाहिजे की, या घोटाळ्यांमुळे त्यांचे राजकीय खेळ कसे चालतात.उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या कार्यप्रणालीवरही टीका केली. काहीतरी फसव्या योजना राबवल्या जात आहेत.
एका बाजूला बहिणींना १५०० रुपये आणि दुसऱ्या बाजूला पैशांच्या गोंधळात थप्प्यांचे खेळ चालले आहेत. हा भाजप-शिंदे आणि अजित पवारांचा ‘नोट जिहाद’ आहे का?, असा सवाल त्यांनी केला.विनोद तावडे यांना पीएचडी मिळालेली पाहिजे कारण त्यांनी सरकारे पाडली आणि भाजपची सत्ता स्थापन केली. आता महाराष्ट्राच्या जनतेला या प्रकरणावर निर्णय घ्यावा लागेल, असेहीउद्धव ठाकरे यांनी पुढे म्हणाले.