भारतीय क्रिकेट संघाच्या नवीन वनडे जर्सीचे अनावरण

0

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाच्या नवीन वनडे जर्सीचे अनावरण करण्यात आले आहे. जर्सीचा रंग तोच राहणार आहे, पण त्याची शैली बदलली आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी मुंबईतील बोर्डाच्या कार्यालयात संघाच्या नवीन जर्सीचे अनावरण केले. यावेळी भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरही उपस्थित होती. ही जर्सी जर्मन स्पोर्ट्सवेअर कंपनी आदिदासने बनवली आहे.

संघाची पूर्वीची जर्सी पूर्णपणे निळ्या रंगाची होती आणि तिच्या खांद्यावर तीन आदिदास (Adidas) लोगोचे पट्टे होते. विश्वचषकादरम्यान ते पट्टे तिरंग्याच्या रंगाचे करण्यात आले होते. नव्या जर्सीमध्येही खांद्यावर आदिदास लोगोचे तीन पट्टे आहेत, ज्यांचा रंग पांढरा आहे. त्यासह खांद्याच्या भागाला तिरंग्याची शेड देण्यात आली आहे. त्यावर तीन पट्टे लावण्यात आले आहेत. या जर्सीचा निळा रंग आधीच्या जर्सीपेक्षा थोडा फिकट आहे, पण बाजूने हा रंग गडद करण्यात आला आहे.

ही जर्सी डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात पहिल्यांदा वापरली जाणार आहे. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जात असून तेथे वनडे आणि टी२० मालिका खेळणार आहे. वनडे मालिकेदरम्यान भारतीय संघ पहिल्यांदा ही जर्सी घालून मैदानात उतरणार आहे. मात्र ही जर्सी केवळ महिला संघासाठी नाही, तर पुरुष संघ देखील परिधान करताना दिसणार आहे. भारतीय पुरुष संघ जानेवारी २०२५ मध्ये इंग्लंडविरुद्ध पहिल्यांदा या जर्सीत दिसणार आहे. त्यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन टी२० सामन्यांची मालिका खेळवली जाईल. यानंतर फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही भारतीय संघ या जर्सीत दिसणार आहे. पुढील वर्षी भारतात होणाऱ्या महिला वनडे विश्वचषकादरम्यानही या जर्सीत दिसू शकते.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech