ठाणे, 26 फेब्रुवारी – वर्तकनगर, ठाणे येथील इमारत क्रमांक 18 एकता को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी या संस्थेच्या ज्येष्ठ नागरिकांनी मंगळवार, दि. 25 फेब्रुवारी रोजी तोंडाला काळ्या फिती लावून पुराणिक बिल्डर्सच्या कार्यालयावर मूक मोर्चा काढला व निषेध आंदोलन केले.
पुराणिक बिल्डर्सने 40 सभासदांची 9 कोटी थकबाकी दिलेली नाही, घरांचा ताबा देऊनही गेले 27 महिने घरांची नोंदणी केलेली नाही, नोंदणीकृत कराराप्रमाणे कोणत्याही कामाची पूर्तता केलेली नाही, असे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. गेल्या काही महिन्यांपासून रहिवासी सातत्याने आंदोलन करत आहेत. मात्र बिल्डर दाद देत नाही.
एकता को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी या संस्थेच्या सभासदांना न्याय मिळावा म्हणून ठाणे येथील कोर्टात पुराणिक बिल्डर्स विरोधात केस चालू आहे अशी माहिती यावेळी दिली गेली.