माझी वसुंधरा 4.0 अभियानात ठाणे महापालिकेने पटकावला तिसरा क्रमांक

0

ठाणे : राज्यशासनाच्या पर्यावरण व वातावरण बदल विभागाच्या माध्यमातून दरवर्षी माझी वसुंधरा 4.0 अभियान राबविण्यात येते. शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार ठाणे महानगरपालिकेने 1 एप्रिल 2023 ते 31 मे 2024 या कालावधीत पर्यावरण संवर्धनासाठी विविध कार्यक्रम राबविले. या मोहिमेतंर्गत्‍ अमृत गटातून 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गटामध्ये ठाणे महानगरपालिकेने तिसऱ्या क्रमांकासह 6 कोटींचे बक्षीस प्राप्त केले असल्याचे शासनाच्या पर्यावरण व वातावरण विभागाने नुकतेच जाहिर केले. हा पुरस्कार ठाणे महापालिकेने प्राप्त केल्याबद्दल शासनाने महापालिका प्रशासनाचे कौतुक केले असल्याची माहिती आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

राज्यशासनाच्या माध्यमातून दरवर्षी माझी वसुंधरा 4.0 हे अभियान राबविण्याबाबत दिलेल्या निर्देशानुसार ठाणे महापालिकेने विभागातंर्गत वर्षभर विविध उपक्रम राबवून पर्यावरणाचे जतन व संवर्धन चांगल्या प्रकारे केले आहे. यामध्ये महापालिका क्षेत्रामध्ये 1 लाख 28 हजार 156 भारतीय प्रजातींच्या वृक्षांची लागवड एकूण 62 हेक्टर जागेत व 883 मीटर लांब रस्त्यांच्या कडेला केली आहे. तर 83 नवीन हरित क्षेत्रांची निर्मिती केली असून निगा व देखभाल पी.पी तत्वावर विविध संस्थांच्या माध्यमातून करीत आहे.

तसेच दैनंदिन जमा होणाऱ्या ओला व सुका कचरा प्रकल्प कार्यान्वित केले असून 10 सुका कचरा व्यवस्थापन प्रकल्प तर 8 खतनिर्मिती प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे बायो मेडिकल वेस्ट आणि C & D वेस्ट यावर मोठ्या प्रमाणात संकलन व पुनर्चक्रीकरणाची प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच प्लॅस्टिक बंदी मोहिम प्रभावीपणे सातत्याने सुरू आहे. परिवहन उपक्रमातंर्गत 123 ई-बसेस खरेदी करुन विद्युत वाहनांना चार्जिंग सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

महापालिका क्षेत्रातील वायू प्रदुषण नियंत्रणात ठेवण्याकरिता ठिकठिकाणी वायू गुणवत्ता मोजमाप यंत्रणा बसवून त्या आधारे आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. महापालिका क्षेत्रातील इमारती व मोठ्या संकुलामध्ये रेन हार्वेर्स्टींग ‍सिस्टीम बसवून लाखो लीटर पाण्याचे संवर्धन करण्यात येत आहे, तर वीज बचतीसाठी सर्व ठिकाणी एलईडी दिव्यांचा वापर सुरू असून वीजबचतीचे महत्व पटवून देण्यासाठी शाळा व गृहसंकुलामध्ये जनजागृती करण्यात येत आहे.

महापालिकेने राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती शासनाकडे तयार करण्यात आलेल्या पोर्टलवर वेळोवेळी सादर करण्यात आली. पर्यावरणाशी निगडीत असलेल्या या सर्व उपक्रमांची नोंद घेवून माझी वसुंधरा अभियान 4.0 हे यशस्वीपणे राबविल्याबद्दल ठाणे महापालिकेस तिसरा क्रमांक प्राप्त झाला आहे. या उपक्रमामध्ये महापालिका प्रशासनासोबत नागरिकांचा देखील महत्वाचा सहभाग असल्याबद्दल आयुक्त सौरभ राव यांनी ठाणेकर नागरिकांचे तसेच प्रदुषण नियंत्रण विभागाच्या मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांच्यासह सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech