मुंबई : महागाई आणि आर्थिक संकटांनी पिचलेल्या पाकिस्तानात पुन्हा एकदा अस्थिरता निर्माण झाली आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या समर्थकांनी हिंसाचाराचा मार्ग अवलंबल्याने देश गृहयुद्धाच्या उंबरठ्यावर असल्याचा दावा केला जात आहे.
७२ वर्षीय इम्रान खान ऑगस्ट २०२३ पासून तुरुंगात असून त्यांच्या सुटकेसाठी त्यांच्या पक्षाने (PTI) देशव्यापी आंदोलन छेडले आहे. काल(सोमवारी) पीटीआय कार्यकर्त्यांनी इस्लामाबादमध्ये लाँग मार्च काढला आणि नंतर धरणे आंदोलनाची घोषणा केली.
मात्र, पोलिसांशी अनेक ठिकाणी धुमश्चक्री झाल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. परिस्थिती आवाक्यात आणण्यासाठी पाकिस्तान सरकारने लष्कराला पाचारण केले.
संविधानातील अनुच्छेद २४५ लागू केला आहे. याशिवाय, आंदोलनकर्त्यांना दिसताच गोळी मारण्याचे आदेश दिले आहेत. सध्या मोठ्या प्रमाणावर लष्करी दल तैनात असून प्रमुख शहरांमध्ये तणाव आहे.
इम्रान समर्थकांनी सरकारवर हुकूमशाहीचे आरोप लावले असून, काही कायद्यात बदल करून इम्रान यांना तुरुंगातच संपवण्याचा कट रचल्याचा दावा केला आहे.
या पार्श्वभूमीवर समर्थक अधिक आक्रमक झाले आहेत. फजल-उर-रेहमान यांच्या आंदोलनामुळे अशांत झाले होते, मात्र त्याचा राजकीय प्रभाव कमी पडला. परंतु इम्रान समर्थकांचे आंदोलन अधिक भयानक रूप धारण करत असल्याने देश गृहयुद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे, अशी भीती व्यक्त केली जात आहे.